फ्रंटलाइन कामगारांप्रमाणे कलाकारांचा आदर करा, शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा आणि जीव वाचवा -सिंटा
तारक मेहताच्या सेटवर कुश शाह आणि आणखी ३ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, अनुपमा मालिकेतील अभिनेता सुधांशु पांडे कोविडने बाधित झाल्यानंतर आता घरातून शूटिंग करीत आहे. भोपाळमध्ये एका वेबसीरीजचे शूटिंग करीत असलेला अभिनेता अनिरुद्ध दवे क्रिटिकल आहे, अभिनेत्री-अँकर श्रीप्रदाचे कोरोनामुळे निधन झाले. मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटीलचेही कोरोनामुळे निधन झाले. अनुपमा मालिकेतील अभिनेत्री तस्नीम शेखलाही कोरोनाची लागण झाली होती. ती म्हणते पहिले तीन दिवस खूपच भयानक होते. गेल्या काही दिवसातील या वर्तमानपत्रातील बातम्या आहेत. या बातम्यांमुळे कलाकारांना चांगलाच धक्का बसला आहे. अक्षय कुमार ते गोविंदा, आलिया भट्ट ते कॅटरिना कैफ, विकी कौशल ते भूमी पेडणेकर, आमिर खान ते आर. माधवन आणि मनोज वाजपेयी ते रणवीर शौरी या मोठ्या कलाकारांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.

सेटवर कोरोनाबाबत योग्य काळजी घेतली जात नसल्याचे ताजे उदाहरण आहे मेजर बिक्रमजीत सिंह यांचे कोरोनामुळे झालेले निधन. बिक्रमजीत आणि आणखी दोन सहकलाकारांनी विमानाने एकत्र प्रवास केला. वेगळ्या हॉटेलमध्ये राहिले आणि पुन्हा विमानाने एकत्र प्रवास केला. मात्र या तिघांमध्ये एक गोष्ट सामायिक होती आणि ती म्हणजे त्यांनी लखनऊमध्ये एकाच व्हॅनिटी व्हॅनचा उपयोग केला होता. आणि परतल्यानंतर त्यांनी पत्नी-मुलांसह घरच्यांनाही कोरोनाग्रस्त केले. बिक्रमजीत सिंह यांना प्राणाची किंमत मोजावी लागली. कोरोनामुळे मालिका, चित्रपटाच्या सेटवर झालेला हा मृत्यू एक प्रतिनिधीक म्हणावा लागेल.
कोरोना काळात निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसनी महाराष्ट्राच्या सीमांच्या पलीकडे जाऊन शूटिंग सुरू करण्याच्या प्रयत्नांचे सिने अ‍ॅण्ड टेलिव्हिजन अॅक्टर्स असोसिएशनने (सिन्टा) ने कौतुक केले. मात्र त्याचवेळी सेटवर कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेत नसल्याबद्दल आणि कलाकारांचे मृत्यू होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त करीत याची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्राबाहेर शूटिंग करताना कोरोनाबाबतच्या सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगत राज्य सरकारने जारी केलेल्या एसओपीची एक प्रत यूनिटमधील सर्व सदस्यांना द्यावी असे सांगत एखाद्या सदस्याने या नियमांचे पालन केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण यूनिटला भोगावे लागतील असेही सिंटाने म्हटले आहे.

कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे पहिल्या आरटी-पीसीआरमध्ये टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते त्यामुळे शूटिंग सुरु करण्यापूर्वी आणि शूटिंग झाल्यानंतर संपूर्ण यूनिटवा आयसोलेट केले पाहिजे असेही सिंटाने निर्मात्यांना बजावले आहे. तसेच निर्मात्यांनी सेटवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत तसेच कलाकारांच्या आरटी-पीसीआर टेस्टही केल्या पाहिजेत असेही सिंटाने म्हटले आहे.
“मालिकांचे शूटिंग बायो बबलमध्ये केले जात आहे हे खूप चांगले आहे. परंतु आताच आपण पाहिले कि आयपीएलही बायो बबलमध्ये होत असतानाही अनेक क्रिकेटर्सना कोरोनाची लागण झाली. ही अत्यंत गंभीर बाब असल्याने मालिकांच्या सेटवरही असे होऊ शकते. शूटिंग करण्यासाठी कलाका एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी विमानाचा वापर करतात. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता दहापट अधिक आहे. असे मत सिंटाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे.

सिंटाच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, सर्व निर्मात्यांनी अभिनेते आणि तंत्रज्ञांच्या आरोग्य आणि जीवनाचे रक्षण केले पाहिजे. आमच्या सदस्यांवर कोणताही भार न टाकता निर्मात्यांनी त्यांच्यासाठीता वैद्यकीय खर्च उचलला पाहिजे. तसेच कोरोना काळात प्रत्येक सदस्याला ३० दिवसांचे मानधन दिले पाहिजे असा आग्रहही सिंटाच्या प्रवक्त्यांनी केला आहे. तसेच गेल्या काही काळापासून निर्मात्यांनी आमच्या सदस्यांचे पैसे दिलेले नाहीत. यापैकी काही रक्कम तर फक्त ३ हजार रुपये इतकीच असतानाही अनेक मोठ्या निर्मात्यांनी ती दिली नाही असे सांगत याबाबत नाराजीही व्यक्त केली. काही कलाकारांनी काम करण्यास नकार दिल्याने त्यांना न सांगता काढून त्यांच्या जागी नवे कलाकार घेण्यात आले त्यांना निर्मात्यांनी भरपाई द्यावी असा आग्रहही सिंटाने धरला आहे.

“बरेचसे निर्माता सिने कामगार हे फ्रंटलाइन वर्कर असल्याचे म्हणत आहेत, पण आम्ही हे सांगू इच्छितो की प्रत्यक्षात कलाकार हेच फ्रंटलाईन वर्कर आहेत. कारण हे कलाकारच मास्क न वापरता त्यांचे शूटिंग करतात, संवाद बोलतात, एवढेच नव्हे तर ते मेक-अप कलाकार, स्टायलिस्ट इत्यादींच्या निकट संपर्कात असतात म्हणून त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे. त्यामुळे तेच खरे फ्रंटलाईन वर्कर आहेत. जर एखाद्या अभिनेत्याला कोरोना झाली तर त्याचा वैद्यकीय खर्च, विमा, इजा कवच, मृत्यू कवच इ. ची काळजी कोण घेणार? ब्रॉडकास्टर्स घेणार आहे का, स्टुडिओ घेणार आहे, निर्मात्यांची संस्था घेणार आहे की निर्माता स्वतंत्रपणे घेणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे” असा प्रश्नही सिंटाने केला असून कलाकारांचाही फ्रंट लाईन वर्कर आदर करा आणि सेटवर कोरोनाबाबतच्या शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करा असा सल्ला निर्मात्यांना दिला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- अनुशा श्रीनिवासन अय्यर, नारद पीआर- 9820535230/9082798384.